spot_img
spot_img

दोन महिने दुकान बंद… आत बसला अजगर! लोणारमध्ये खळबळ

लोणार (हॅलो बुलडाणा) लोणार शहरात तहसील कार्यालयासमोरील एका दुकानात अचानक अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दोन महिन्यांपासून बंद असलेल्या नारायण रमेश आढाव यांच्या दुकानात हा प्रकार उघडकीस आला.

माहितीनुसार, दुकानाची साफसफाई करण्यासाठी नारायण आढाव यांचे वडील रमेश आढाव सकाळी सुमारे ११ वाजता दुकानात आले होते. दुकानात ठेवलेली रिकामी पोती हलवत असताना पोत्यांच्या खाली अचानक जाडजूड साप दिसून आल्याने ते घाबरले. त्यांनी तत्काळ निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशनचे सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना माहिती दिली.

घटनास्थळी पोहोचलेल्या सर्पमित्रांनी पाहणी केली असता हा अजगर जातीचा बिनविषारी साप असल्याचे स्पष्ट झाले. इंग्रजीमध्ये याला इंडियन रॉक पायथन (Indian Rock Python) म्हणतात. सुमारे दीड वर्षांचे आणि जवळपास तीन फूट लांबीचे हे पिल्लू असल्याचे सांगण्यात आले. अजगराची लांबी साधारणतः १० फूटांपर्यंत वाढू शकते.

सर्पमित्रांनी सुरक्षितरित्या अजगर पकडून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. या वेळी सर्पमित्र कमलेश आगरकर आणि सचिन कापुरे उपस्थित होते.दरम्यान, १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अजगर हा शेड्युल-१ मध्ये समाविष्ट असून त्याला मारणे किंवा पकडून ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे, असे सर्पमित्रांनी नागरिकांना सांगितले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!