मोताळा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील तरवाडी शिवारातील गिट्टी खदान परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून, गिट्टी भरण्यास गेलेल्या टिप्पर चालकावर खदान मालकानेच लाकडी दांड्याने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात चालकाचा पाय मोडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरसोळा (ता. मलकापूर) येथील भागवत संतोष शेळके (वय २४) हे टिप्पर चालक असून ते एमएच-२८-बीबी-९९१० क्रमांकाच्या १२१५ टिप्परवर चालक म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे मालकाच्या सांगण्यावरून ते तरवाडी शिवारातील सौरभ श्रीधर तायडे (पाटील) यांच्या भूमीपुत्र स्टोन क्रेशन येथे गिट्टी भरण्यासाठी गेले होते.
बुधवारी (४ मार्च) सकाळी सुमारे साडेआठच्या सुमारास शेळके खदान परिसरात पोहोचले. त्यांनी खदान मालक सौरभ तायडे यांना गिट्टी भरण्याबाबत सांगितले असता, तायडे यांनी प्रथम गाडी मालकाशी फोनवर बोलणे केले. त्यानंतर त्यांनी चालकाला गाडीखाली उतरून मागील बाजूस येण्यास सांगितले.
तक्रारीनुसार, “तू नेहमी माझ्या खदानवरून गिट्टी चोरून नेत असतोस” असा आरोप करत तायडे यांनी गाडीतील लाकडी टेंपे (दांडा) हातात घेऊन शेळके यांच्या डाव्या पायावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात शेळके यांचा पाय गंभीररीत्या मोडला. जखमी अवस्थेत त्यांनी कसाबसा टिप्पर चालवत तेथून पळ काढला.
यानंतर त्यांनी ट्रक मालकांना फोन करून घटनेची माहिती दिली. मालकांनी त्यांना तातडीने बोराखेडी पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी प्रथम मोताळा ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून पुढील उपचारासाठी बुलडाणा सामान्य रुग्णालयात रेफर केले.
या घटनेबाबत बोराखेडी पोलिसांनी सौरभ श्रीधर तायडे (रा. वरखेड, ता. मलकापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बिट हवालदार सुपडसिंग चव्हाण करत आहेत. घटनेमुळे खदान परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.












