बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलडाणा अर्बनच्या वतीने आयोजित २१, १० आणि ५ किलोमीटरची भव्य फॉरेस्ट मॅरेथॉन आज गिरडा घाट परिसरात उत्साहात पार पडली. निसर्गरम्य वातावरण, थंडगार हवा आणि फिटनेसचा जोश यामुळे या स्पर्धेला तब्बल १००० हून अधिक धावकांनी दमदार प्रतिसाद दिला. आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक जाणीवेचा संदेश देणारी ही मॅरेथॉन शहरासाठी प्रेरणादायी ठरली.
गिरडा येथील स्वयंप्रकाश संस्थान परिसरातून सकाळी लवकर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या उपस्थितीत स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक (भाईजी), अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर, आमदार संजय गायकवाड, आमदार धीरज लिंगाडे, सरपंच सुनिता गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
२१ किलोमीटर स्पर्धेत पुरुष गटात आकाश बारवाल, गौरव हिवाळे आणि जीवन भालके यांनी तर महिला गटात रितू तळमळे, प्रणिता पाटील आणि रती महाजन यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ४५ वर्षांवरील गटात पुरुषांमध्ये राजेश कोचे, प्रशांत राऊत, अजबराव आखरे, तर महिलांमध्ये राधिका दमाणी, डॉ. अनिता राठोड आणि वैशाली बडगुजर विजेते ठरले.
१० किलोमीटर स्पर्धेत १८ ते ४५ वयोगटात पुरुषांमध्ये यश पांडे, सागर मोरे, विदेश वाघ, तर महिलांमध्ये तृप्ती जाधव, सोनाली पाठक आणि मृणाल पडोसळे यांनी बाजी मारली. ४६ वर्षांवरील गटात शरद खिल्लारे, महेश महाजन, संजय तेली आणि महिलांमध्ये अनिता कापरे, अनुपमा मोटवानी, मंगल गवई विजयी झाले.
स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व धावकांना बुलडाणा अर्बनच्या वतीने पदके देण्यात आली. धावपटूंकरिता पाणी, फळे आणि बिस्किटांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवक, वैद्यकीय पथक आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत स्पर्धा सुरळीत पार पाडली.सहकार विद्या मंदिराच्या विद्यार्थी बॅण्ड पथकाने वातावरण रंगवले, तर वन्यजीवांचे वेश परिधान करून “जंगल बचाव”चा संदेश देण्यात आला.












