बुलडाणा (हॅलो बुलडाणा) बुलडाण्यातील सहकार विद्या मंदिरचा विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या प्रात्यक्षिक टप्प्यात सहकार विद्या मंदिर, बुलडाणा येथील इयत्ता ६ वीचा चि. अमेय महाजन याने घवघवीत यश संपादन केले आहे.
तीन स्तरांमध्ये होणाऱ्या या स्पर्धात्मक परीक्षेत अमेयने पहिल्या स्तरावर तब्बल ६९ गुणांची कमाई केली, तर द्वितीय स्तरावर २२.५ गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची तृतीय स्तरावरील मुलाखतीसाठी निवड झाली असून आता त्याची झेप थेट पुढील फेरीकडे लागली आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. कोमल झंवर, प्राचार्य व मुख्याध्यापिका यांनी अमेयचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अमेयने आपल्या यशाचे श्रेय संस्थेच्या मार्गदर्शनाला आणि शिक्षकवृंदांच्या अथक परिश्रमांना दिले आहे.












