अमडापुर (हॅलो बुलडाणा) मौजे इसोली येथे महावितरण अंतर्गत कार्यरत तंत्रज्ञ राम बद्रीनाथ बराटे यांच्यावर तब्बल ५ लाख ३९ हजार १२० रुपयांच्या वीज बिल रकमेचा अपहार केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून अमडापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे इसोली गावात संतापाची लाट उसळली आहे.
सहाय्यक अभियंता जयंत सुभाष गोलाइत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बराटे यांना ३ जून २०२५ पासून इसोली गावाचा कार्यभार देण्यात आला होता. त्यांनी ५ जून ते १३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सुमारे ८० ते ८५ वीज ग्राहकांकडून रोख स्वरूपात बिलाची रक्कम स्वीकारली. मात्र ही रक्कम कार्यालयात जमा करण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे. एकूण अंदाजे ५,३९,१२० रुपये थेट हवेत विरल्याचा आरोप आहे.
ग्राहकांकडून वारंवार तक्रारी, ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच समक्ष बैठक, तसेच बिल वाटप करणारे कर्मचारी सुनील चव्हाण यांनी दिलेली माहिती यामुळे हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, संबंधित तंत्रज्ञाचा मोबाईल क्रमांक अनेकदा बंद किंवा कव्हरेजबाहेर असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे गावातील वीजसेवा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यालयाला पर्यायी व्यवस्था करावी लागत असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकारामुळे महावितरणच्या महसुलाला मोठा फटका बसला असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अमडापुर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास ग्रेड पोउपनि अच्युतराव सिरसाठ यांच्याकडे सोपविला आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.












