खामगाव (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील कदमापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राजेश कोगदे यांनी शिक्षण क्षेत्रात अक्षरशः क्रांती घडवून आणली आहे. “माझ्या वर्गात गणितात ढ विद्यार्थीच नाही” असा ठाम दावा करत त्यांनी एक भन्नाट आव्हान दिले आहे.गणितात कमजोर विद्यार्थी दाखवा आणि थेट 1000 रुपये मिळवा
गणिताची भीती घालवण्यासाठी कोगदे गुरुजींनी कोणत्याही महागड्या तंत्रज्ञानाचा आधार न घेता फक्त प्लास्टिक पाईपपासून एक अनोखे गणकयंत्र तयार केले आहे. विशेष म्हणजे हे गणकयंत्र चालवण्यासाठी ना बॅटरी लागते ना वीज! पूर्णपणे शून्य खर्चात तयार झालेले हे साधन विद्यार्थ्यांसाठी ‘खेळता खेळता गणित शिकवणारे शिक्षक’ ठरत आहे.
या गणकयंत्राच्या मदतीने विद्यार्थी बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार सहजपणे पडताळू शकतात. उत्तर चुकले तर हे साधन लगेच विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका दाखवते. परिणामी गणिताची भीती दूर होऊन विद्यार्थ्यांमध्ये विषयाविषयी आत्मविश्वास आणि आवड निर्माण होत आहे.
कोगदे गुरुजींच्या वर्गात तब्बल 38 विद्यार्थी असून सर्व विद्यार्थी गणितात प्रगत असल्याचा त्यांचा ठाम दावा आहे. “एकही विद्यार्थी मागे राहणार नाही” या निर्धारातूनच हे अभिनव प्रयोग साकारले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून मिळणारे प्रोत्साहन आणि शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक वातावरण यामुळेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी असे प्रयोग शक्य होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.












