spot_img
spot_img

शेलोडी रोडवर कुंटणखान्यावर पोलिसांचा हातोडा! देहविक्री अड्डा उद्ध्वस्त

खामगाव (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील शेलोडी रोड परिसरात सुरु असलेल्या अवैध देहविक्री व्यवसायावर अखेर पोलिसांनी कडक हात टाकत मोठी कारवाई केली आहे. अनेक दिवसांपासून संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या एका घरावर रात्री उशिरा टाकलेल्या धाडीत हा कुंटणखाना उद्ध्वस्त करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या या अवैध धंद्याची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आदित्यकुमार सिंग यांच्या पथकाने सापळा रचत थेट छापा टाकला. या कारवाईत तीन महिला, चार पुरुष आणि एक महिला एजंट यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेलोडी रोड परिसरातील नागरिकांना या ठिकाणी सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींचा त्रास सहन करावा लागत होता. रात्री अपरात्री होणारी ये-जा, अनोळखी व्यक्तींची वर्दळ आणि वाढती अस्वस्थता यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला होता. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता.

अखेर वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत हा अवैध अड्डा उध्वस्त केला. या धंद्यामुळे परिसरातील शांतता आणि सामाजिक वातावरण बिघडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली होती. पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिकांना दिलासा मिळाला असून अशा अनैतिक कृत्यांविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याचे काम सुरू असून अशा अवैध व्यवसायांवर पोलिसांचा करडी नजर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!