बीबी (हॅलो बुलडाणा/प्रदीप साळवे) बीड ते सुलतानपूर प्रवासादरम्यान एका दिव्यांग प्रवाशाला अपमानास्पद वागणूक मिळाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शेख अहमद शेख अमजद हे प्रवास करत असताना त्यांनी शासनाने दिलेले दिव्यांग ओळखपत्र दाखवून सवलतीच्या तिकिटाची मागणी केली. मात्र नांदगाव माहूरगड बसच्या वाहकाने हे कार्ड बनावट असल्याचा आरोप करत ते स्वीकारण्यास नकार दिला.
कार्ड स्कॅन केल्यानंतर ते वाचले गेले नाही, असे सांगत वाहकाने पूर्ण तिकीट घेण्याचा आग्रह धरला. यामुळे बसमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. “मी बोगस नाही, माझे कार्ड खरे आहे. बस थेट पोलीस स्टेशनला घ्या,” असे आव्हान देत दिव्यांग प्रवाशाने स्वतः पुढाकार घेतला. त्यानंतर बस थेट बीबी पोलीस ठाण्यात नेण्यात आली.
या प्रकरणात संबंधित प्रवासी खरोखर दिव्यांग असल्याचे स्पष्ट झाले. मात्र शासनाच्या ढिसाळ आणि त्रुटीपूर्ण यंत्रणेमुळे खऱ्या दिव्यांग नागरिकांना संशयाच्या भोवऱ्यात अडकून मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.प्रशासनाच्या निष्काळजी व्यवस्थापनाचा फटका आता थेट दिव्यांग बांधवांना बसत असून, त्यांच्या सन्मानावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.












