spot_img
spot_img

राष्ट्रपतींच्या दौऱ्यात पास वाटपात मोठा घोटाळा?लोकशाहीचा चौथा स्तंभ रोखला! नगराध्यक्षांसह पत्रकारांना हेटाळणी – शेगावात कोण चालवतंय सत्ता?

शेगाव (हॅलो बुलडाणा/महेंद्र मिश्रा) देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेलाच जर सत्ताधारी आणि प्रशासनाकडून गप्प बसवण्याचा प्रयत्न होत असेल, तर हे लोकशाहीसाठी गंभीर इशारा मानावा लागेल. मुंबईत शिवसेना (उबाठा) गटाच्या माजी महापौर विशाखा राऊत यांनी महिला पत्रकार शिल्पा नलावडे यांची अवकात काढल्याची घटना ताजी असतानाच, शेगावात पत्रकार समीर देशमुख यांना थेट वृत्तांकनापासून रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

इतक्यावरच थांबता का? तर नाही!

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव दौऱ्यादरम्यान प्रशासनाने “जागा अपुरी” असल्याचे कारण देत अनेक पत्रकारांना पास नाकारले. मात्र आश्चर्य म्हणजे, ज्यांना पत्रकारितेचा ‘प’ सुद्धा माहिती नाही, अशा चेहऱ्यांना मात्र ‘चेहरे पाहून’ पास वाटप करण्यात आले! यामुळे खरी पत्रकारिता करणाऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.

या मनमानीविरोधात काही पत्रकारांनी सोशल मीडियावर अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवत त्यांच्या ‘आकलीचे तार’ काढले. त्यानंतर काही अधिकारी जागे झाले आणि समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागले, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

या संपूर्ण गोंधळामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष चे स्थानिक कार्यकर्तेही नाराज झाले असून काहींनी कार्यक्रमाच्या पत्रिका परत केल्याची चर्चा आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेगावचे प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षांनाही पास नाकारण्यात आल्याचा व्हिडिओ काँग्रेस च्या माजी शहराध्यक्षांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

पत्रकार, राजकारणी आणि जनसामान्यांमध्ये आता एकच चर्चा रंगली आहे.हा सगळा प्रकार नेमका कोणाच्या इशाऱ्यावर झाला? आणि प्रशासन पत्रकारांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे का? या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी आता शेगावातून होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!