spot_img
spot_img

काळीज हेलावणारी घटना: आईचा अपघाती मृत्यू, पण ‘ब्लूटूथ’च्या सादतीने पिल्लाला मिळाली मायेची ऊब!

​​सुलतानपूर (हॅलो बुलडाणा/मोईन खान)
निसर्ग आणि मानवी संवेदनांचा एक हृदयस्पर्शी संगम नुकताच सुलतानपूर परिसरात पाहायला मिळाला. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या एका अपघातात मादी वानराचा मृत्यू झाला असताना, तिच्या पिल्लाला मात्र वनविभागाच्या सतर्कतेमुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या कल्पक वापरामुळे पुन्हा आपले कुटुंब मिळाले आहे.

नेमकी घटना काय?
​२३ फेब्रुवारी रोजी सुलतानपूर परिसरात एका अज्ञात वाहनाने मादी वानराला धडक दिली. या भीषण अपघातात मादी वानर जागीच ठार झाली, परंतु तिच्या कुशीत असलेले तिचे लहान पिल्लू सुदैवाने सुरक्षित वाचले. स्थानिक पत्रकार शेख जमीर शेख मज्जीद यांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला दिली.
ब्लूटूथ स्पीकर ठरला ‘देवदूत’
​वनविभागाच्या पथकाने पिल्लाला ताब्यात घेऊन लोणार येथील मुख्यालयात प्राथमिक उपचार केले. पिल्लू सुदृढ असल्याचे समजताच, त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात (कळपात) सोडण्याचे मोठे आव्हान समोर होते. २४ फेब्रुवारी रोजी सहाय्यक वनसंरक्षक काकडे सर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सातपुते सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनोखी मोहीम राबवण्यात आली.पिल्लाचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून तो ‘ब्लूटूथ’ स्पीकरच्या माध्यमातून मोठ्या आवाजात वाजवण्यात आला.पिलाचा आवाज ऐकताच वानरांचा कळप त्या दिशेने आकर्षित झाला.

हृदयस्पर्शी पुनर्मिलन
​काही वेळातच कळपातील एका मादी वानराने पुढे येत त्या पिल्लाला मायेने जवळ घेतले आणि आपल्या कवेत घेऊन कळपात सामावून घेतले. इतर वानरांनीही या पिल्लाचा स्वीकार केल्याचे पाहून उपस्थितांना मोठा दिलासा मिळाला.
​या यशस्वी मोहिमेत वनपाल फुके साहेब, वनरक्षक कैलास चौधरी, अभयसिंग पवार आणि माणिक कायंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. वन्यजीवांप्रती दाखवलेली ही संवेदनशीलता आज सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!