चिखली (हॅलो बुलडाणा) शहरात गुन्हेगारीचे सावट पुन्हा एकदा गडद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 23 फेब्रुवारीच्या रात्री साडेदहाच्या सुमारास भंगार गल्ली परिसरात एका तरुणाला अडवून तीन जणांनी जबरदस्तीने रोख रक्कम आणि महागडा मोबाईल हिसकावून नेल्याने खळबळ उडाली आहे.
प्रशांत राजेश काळे (वय 26), रा. खैरव ता. चिखली हे आपल्या मोटारसायकलने घरी जात असताना बॉम्बे मार्केट परिसरात चिल्या नावाच्या तरुणाने त्यांची गाडी थांबवली. यावेळी त्याने प्रशांत यांच्या खिशातील मोबाईल हिसकावला आणि पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगताच त्याच्या साथीदारांनी परिस्थिती अधिक गंभीर केली.
गोपाळ व विज्या या दोघांनी प्रशांत यांना पकडून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील 2,500 रुपये रोख रक्कम आणि अंदाजे 30,000 रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने लुटला. एवढ्यावरच न थांबता, “जर कोणाला सांगितले तर खल्लास करू” अशी जीवे मारण्याची धमकी देत तिघेही फरार झाले.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.संबंधित तिघांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.












