नांदुरा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील कोलासर गावात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धाड टाकत २६ बकऱ्या-बोकड पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष श्रीराम देवकर (वय ५०), व्यवसाय मजुरी व शेळीपालन, यांच्या टिनशेडचे कुलूप तोडून ही चोरी करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
दिनांक २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते २४ फेब्रुवारी पहाटे ५ दरम्यान हा प्रकार घडला. देवकर यांनी नेहमीप्रमाणे ६० लहान-मोठ्या बकऱ्या टिनशेडमध्ये ठेवून बाहेरून कुलूप लावले होते. मात्र पहाटे पाहणीसाठी गेले असता दरवाज्याची कडी-कोंडा व कुलूप वाकवून तोडलेले दिसले. आत पाहिले असता ६० पैकी तब्बल २६ बकऱ्या गायब
चोरट्यांनी १० लाल रंगाचे बोकड (एक ४ वर्षांचा, ९ अंदाजे २ वर्षांचे) किंमत सुमारे १,१०,००० रुपये तसेच १६ लाल-पांढऱ्या रंगाच्या बकऱ्या (वय अंदाजे ४ वर्षे) किंमत सुमारे १,६०,००० रुपये असा एकूण २,७०,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, टिनशेड २० बाय २० चौरस मीटरचे असूनही चोरट्यांनी कोणतीही चाहूल लागू न देता सफाईदार कामगिरी केली.
या प्रकरणी कायम अप क्र. ११७/२०२६ कलम ३०५ (अ), ३३४ (१) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.











