देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/ संतोष जाधव) लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर शिवभक्त महिला संजीवनी वाघ यांना झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ देऊळगाव राजा शहर शनिवारी कडकडीत बंद ठेवण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने 21 फेब्रुवारी रोजी शहर बंदची हाक देण्यात आली होती. या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली, तसेच आठवडी बाजारही पूर्णपणे ठप्प राहिला.
माहितीनुसार, चिखला काकड येथे पुतळा हलवण्याच्या हालचालींना विरोध करताना संजीवनी वाघ यांना सरपंच व समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. देऊळगाव राजात आंदोलनकर्ते व व्यापाऱ्यांमध्ये काही ठिकाणी किरकोळ वाद झाले; मात्र पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.











