बुलढाणा (हॅलो बुलडाणा) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा परिषदेत अभिमानास्पद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारी जिजाबाई आणि बाल शिवबा यांच्या भव्य शिल्पाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार असून केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव आणि ना. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते शिल्पाचे अनावरण होणार आहे. यावेळी सहपालकमंत्री ना. संजय सावकारे, कामगार मंत्री ना. ॲड. आकाश फुंडकर यांच्यासह आमदार, खासदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी प्रवेशद्वारी राष्ट्रमाता जिजाऊंची प्रतिमा स्थापित होती. आता मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जिजाऊ व बाल शिवबाच्या शिल्पामुळे परिसरात ऐतिहासिक प्रेरणेचा नवा साज चढणार आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी हे शिल्प साकारले आहे.
या सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध शाहीर विक्रांतसिंग राजपूत यांचा दमदार शाहिरी जागर कार्यक्रमही आयोजित करण्यात आला असून, शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवगर्जनेत हा सोहळा पार पडणार असून, शिवजयंतीचा जल्लोष अधिकच दिमाखदार होणार आहे.











