spot_img
spot_img

वन्य प्राण्यांचा पिकांवर डल्ला; मोहना बुद्रुक येथील शेतकरी हवालदिल!

मेहकर (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) मोहना बुद्रुक येथे वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. डोंगरपट्ट्यालगत असलेल्या शेतजमिनींमध्ये रात्रीच्या अंधारात वन्य प्राण्यांचे टोळके शिरत असून उभ्या पिकांचा अक्षरशः फडशा पाडला जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात असल्याची संतप्त भावना परिसरात व्यक्त होत आहे.

येथील शेतकरी मोहन चव्हाण यांच्या गट क्रमांक २०२ व २०३ मधील पाच एकर क्षेत्रात यंदा मोठ्या अपेक्षेने हरभरा पेरण्यात आला होता. मात्र, त्यापैकी तब्बल दोन ते अडीच एकर क्षेत्रातील उभे पीक वन्य प्राण्यांनी पूर्णपणे फस्त केले. काढणीच्या तोंडावर आलेल्या हरभऱ्याचे झालेले नुकसान पाहून चव्हाण कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.

विशेष म्हणजे, पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताभोवती ‘झटका मशीन’ अर्थात सौर कुंपण बसवण्यात आले होते. तरीदेखील वन्य प्राण्यांनी या संरक्षण व्यवस्थेला न जुमानता शेतात घुसखोरी केली. यापूर्वी तुरीचे पीकही अशाच प्रकारे बाधित झाल्याने ते मोडून हरभरा पेरण्यात आला होता. आता दुसरे पीकही हातातून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.इतका खर्च करूनही पीक वाचत नसेल तर शेती करायची कशी? आम्ही जगायचे कसे? असा संतप्त सवाल पीडित शेतकरी मोहन चव्हाण यांनी केला आहे.

या गंभीर प्रकाराकडे वन विभागाने तातडीने लक्ष देऊन नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करावा, तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी आणि डोंगरपट्ट्यात कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!