बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीवरून आता संघर्ष पेटला असून सागवण,येळगाव,जांभरूण, सुंदरखेड आणि माळविहीर येथील ग्रामस्थांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘गाव बचाव कृती समिती’च्या माध्यमातून थेट नगरविकास विभाग व मंत्रालयात निवेदन देत हद्दवाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, चारही गावांच्या सरपंचांनी आंदोलनाला ‘दांडी’ मारल्याची चर्चा रंगली असून सरपंचांचा नेमका विरोध आहे की मूक सहमती,असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामस्थ आक्रमक असताना लोकप्रतिनिधी शांत का, असा प्रश्नही विचारला जात आहे.
नगर परिषदेने २१ डिसेंबर २०२० रोजी ठराव क्रमांक ३४ नुसार हद्दवाढीचा प्रस्ताव मांडला होता. मात्र संबंधित ग्रामपंचायतींनी यास कोणताही संमती ठराव दिलेला नाही. उलट ग्रामसभांनी हद्दवाढीला ठाम विरोध दर्शविला आहे. “नगर परिषदेला आमच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार नाही,” असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
हद्दवाढ प्रस्तावातील लोकसंख्या, क्षेत्रफळ व रोजगारासंदर्भातील आकडेवारी चुकीची असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तसेच सध्याच्या हद्दीतच मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या नगर परिषदेने ग्रामीण भाग समाविष्ट करून नवीन प्रश्न निर्माण करू नयेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“आम्हाला नगर परिषदेत सामील व्हायचे नाही. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या असून आता सरकार काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










