मेहकर (हॅलो बुलडाणा) पांग्री काटे शिवारात सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अफू लागवडीचा पर्दाफाश करत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल १ कोटी ३२ लाख ९ हजार ४०० रुपयांची अफूची झाडे व बोंडे जप्त करण्यात आली. या कारवाईने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
भागवत सदाशीव काटे आणि विशाल रमेश काटे अशी अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पथक सोमवारी रात्री गस्त घालत असताना पांग्री काटे येथे संशयित शेतीवर धाड टाकण्यात आली. गट नं. १४८ आणि १२८ मध्ये अफूचे भरघोस पीक आढळून आले.
सदाशीव काटे याच्या शेतातून १०७ किलो ६६० ग्रॅम वजनाची अफूची झाडे (किंमत अंदाजे ८६,१२,८०० रुपये) तर विशाल काटे याच्या ताब्यातून ५७ किलो ३२० ग्रॅम वजनाची झाडे (किंमत ४५,८५,६०० रुपये) जप्त करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली ही बेकायदेशीर शेती पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. साखरखेर्डा पोलीस ठाणे येथे दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एपीआय गजानन करेवाड, पीएसआय गणेश कड, महसूल व फॉरेन्सिक पथक, अंमली पदार्थ शोधक व श्वान पथकाने संयुक्तपणे ही धाडसी कारवाई यशस्वी केली.










