डोंगर खंडाळा (हॅलो बुलडाणा) पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत डोंगर खंडाळा येथील बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा शेतकरी राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी ४ एकर क्षेत्रावर पॉलिहाऊसमध्ये गुलाब फुलांची लागवड करून यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर तब्बल ६० हजार गुलाब फुलांची निर्यात अहमदाबाद येथे करण्यात आली. दर्जेदार आणि आकर्षक फुलांना तेथे मोठी मागणी मिळाली. सध्या दररोज सुमारे ४ ते ५ हजार फुले उत्पादनातून निघत असून एका फुलाला १० ते १६ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे या प्रयोगातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची चिन्हे आहेत.
पॉलिहाऊस शेतीमुळे हवामानातील बदलांचा कमी परिणाम होतो, दर्जेदार उत्पादन मिळते आणि वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होते, हे भाईजी यांनी सिद्ध करून दाखवले आहे. योग्य नियोजन, सिंचन व्यवस्था, खत व्यवस्थापन आणि बाजारपेठेशी थेट संपर्क यामुळे हा प्रकल्प फायदेशीर ठरला आहे.
राधेश्याम चांडक हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी नवनवीन प्रयोग करण्यास प्रेरित करतात. त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळण्यास उत्सुक झाले आहेत. पारंपरिक शेतीच्या चौकटीबाहेर पडून बाजारपेठेच्या गरजेनुसार उत्पादन घेतल्यास शेतीही नफा देणारा व्यवसाय ठरू शकतो, याचा हा उत्तम नमुना आहे.डोंगर खंडाळ्यातील या सुवासिक यशोगाथेमुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतीला नवी दिशा मिळाली असून, “फुलांमधून फुललेली प्रगती” अशीच या प्रयोगाची ओळख निर्माण झाली आहे.










