बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरालगतच्या सागवन गावात संभाव्य नगरपालिका हद्दवाढीच्या हालचालींविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून नुकत्याच पार पडलेल्या निष्पक्ष बैठकीत प्रशासनावर गंभीर आरोपांची सरबत्ती करण्यात आली. ग्रामस्थांच्या मते, हद्दवाढ प्रस्तावामध्ये गावाचा समावेश करण्याची कोणतीही लोकांची मागणी नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे हे कायद्याचे उल्लंघन आहे.
ग्रामसभेचे २०२१ मधील ठराव दाखवत गावकऱ्यांनी स्पष्ट केले की, सागवन ग्रामपंचायत स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय आधीच घेतलेला आहे. तरीही नगरपालिका व प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता निर्णयप्रक्रिया पुढे नेल्याचा आरोप करण्यात आला. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथील याचिकेच्या संदर्भातून हद्दवाढीची माहिती समोर आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
बैठकीत वक्त्यांनी नगरपरिषदेचा ठराव नियमबाह्य असल्याचा दावा करत, गावावर शहरी करांचा अतिरिक्त बोजा लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले. गावाची सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रशासनिक ओळख पुसण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. सुंदरखेड, येळगाव, माळविहीर यांसह सागवन-जांभरूणचा समावेश करण्याच्या प्रस्तावावरही तीव्र नाराजी व्यक्त झाली.
यावेळी ‘सागवन बचाव कृती समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हद्दवाढ रोखण्यासाठी विविध स्तरावर संघर्ष उभारण्याचा इशाराही देण्यात आला. ग्रामसभेला डावलून घेतलेले निर्णय आम्हाला मान्य नाहीत. गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.बैठकीत महिला व युवकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत गावाच्या अस्मितेसाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.










