बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवत आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी बुलढाणा अर्बन चॅरिटेबलतर्फे फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत अल्पदरात हार्वेस्टर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाईजी, अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर, अध्यक्षा सौ. कोमल मॅडम झंवर, सरव्यवस्थापक श्री. कासट साहेब तसेच विभागीय व्यवस्थापक श्री. सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सौ. कोमल मॅडम यांच्या हस्ते हार्वेस्टरचे उद्घाटन करण्यात आले. या हार्वेस्टरच्या माध्यमातून सोयाबीन, हरभरा, गहू, तूर, उडीद, करडई आदी पिकांची कापणी जलद व कमी खर्चात होणार असून शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरत आहे. वाढत्या मजुरीदरांच्या पार्श्वभूमीवर आधुनिक यंत्रसामग्रीची गरज अधोरेखित होत असताना बुलढाणा अर्बनने घेतलेला हा निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे.
यावेळी विभागीय व्यवस्थापक श्री. भालेराव, शाखा व्यवस्थापक श्री. कराळे व कर्मचारी उपस्थित होते. अल्पदरात उपलब्ध असलेल्या या सुविधेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. कोमल झंवर यांनी केले.










