साखरखेर्डा ( हॅलो बुलढाणा/ दर्शन गवई )
आज ४ जुलै रोजी शासनाने एका लक्षवेधी सूचनेवर रानडुक्कर मारण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली.तो प्राणी कोण मारणार हा मुद्दा महत्त्वाचा असून शेतकऱ्यांजवळ असे कोणतेही हत्यार नाही. ही जबाबदारी शासनाने लक्षात घेऊन या प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित करावा अशी मागणी उठत आहे. याकडे विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.बीड येथील आमदार संदीप शिरसागर यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्र्न मांडतांना शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस या पिकात रानडुक्कर प्रचंड नुकसान करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात , पाडावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. अनेकवेळा मजूरावर या प्राण्यांनी हल्ला देखील केला आहे. त्यावर शासनाने रानडुक्कर मारण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात सवडद , हनवतखेड , हिवरागडलिंग , गुंजमाथा , शेलगावकाकडे, शेवगा जाॅहागीर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रानडुक्कर आहेत.या भागातील शेतकरी ऊस , मका ही पिके घेतात. या पिकाची नासाडी हा प्राणी करतो . सवडद येथील भवानी देशमुख यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार देऊनही पंचनाम्या शिवाय काहीच केले नाही. दोन वर्षांपासून सतत तक्रार, रानडुक्कराचे फोटो दाखवूनही मदत मिळाली नाही.