देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/ संतोष जाधव) अजितदादा अमर रहे…च्या गगनभेदी घोषणांत लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थीकलशाचे आज साश्रू नयनांनी विसर्जन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थीकलशाचे अमरावती विभागासह बुलडाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
दि. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता देऊळगाव राजा बसस्थानक चौकात पवित्र अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो अनुयायांनी भावनांनी भरलेल्या मनाने दर्शन घेतले. त्यानंतर संत चोखासागर (खडकपूर्णा) प्रकल्पात मंत्रोच्चार, विधिवत पूजन व धार्मिक विधी करून अस्थीकलशाचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार दिलीपकुमार सांनदा यांच्यासह राष्ट्रवादी, भाजपा व विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान महसूल व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत शांतता राखली. देऊळगाव राजात आज लोकनेत्याच्या आठवणींनी वातावरण भावूक झाले होते.












