मुंबई (हॅलो बुलडाणा) राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता एका नवीन टप्प्यावर आली आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्यामुळे ज्या महिलांचे हप्ते रखडले होते, त्यांच्यासाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. अशा पात्र महिलांना आता तीन महिन्यांचे थकीत हप्ते मिळून एकत्रित ४५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
नेमकी बातमी काय?
अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केला होता, मात्र आधार लिंकिंग किंवा ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे त्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते रखडले होते. यामुळे महिलांमध्ये काही प्रमाणात नाराजी होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सरकारने थकीत रक्कम देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
कोणाला मिळणार ४५०० रुपये?
थकीत लाभार्थी: ज्या महिलांचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते रखडले होते, त्यांना एकत्रित ४५०० रुपये मिळतील.
नियमित लाभार्थी:
ज्यांना आधीच दोन हप्ते मिळाले आहेत, त्यांना जानेवारी महिन्याचा नियमित १५०० रुपयांचा हप्ता दिला जाईल.हप्ता २१०० रुपये होणार?
निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार, भविष्यात या योजनेचा मासिक हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याची शक्यता आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी याबाबतचे संकेत दिले असून, हा निर्णय झाल्यास राज्यातील लाखो महिलांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे










