सुलतानपूर (हॅलो बुलडाणा/ मोईन खान)
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण राज्यासह बुलडाणा जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवार दि. २९ जानेवारी २०२६ रोजी सुलतानपूर येथे सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच व्यापारी प्रतिष्ठाने, बाजारपेठ आणि सर्व व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या नेत्याला अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.
शिवस्मारक समितीच्या वतीने श्रद्धांजली सभा
आज सुलतानपूर येथे शिवस्मारक समितीच्या वतीने विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवस्मारक समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांनी एकत्र येऊन ना. अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या कार्याचे स्मरण केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
व्यापाऱ्यांचे उत्स्फूर्त समर्थन सुलतानपूरमधील छोट्या-मोठ्या सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या बंदमध्येसहभाग नोंदवला. “अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते नेतृत्व हरपले आहे आणि ही कधीही भरून न निघणारी हानी आहे,” अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या. संपूर्ण गावात अत्यंत शांततेत हा बंद पाळण्यात आला असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.










