बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी आयुष्याची कमाई गोळा करणाऱ्या शेतकऱ्याला लुटणाऱ्या आंतरराज्यीय बॅगलिफ्टरला अखेर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. कर्नाटकातील शिवमोगा येथे थरारक शोधमोहीम राबवत आरोपीकडून चोरीस गेलेले संपूर्ण ५ लाख रुपये हस्तगत करण्यात आले असून, ही कारवाई म्हणजे गुन्हेगारांसाठी थेट इशाराच आहे.
दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी रिसोड (जि. वाशीम) येथील शेतकरी नितीन जिजेबा प-हाड यांनी मुलगी श्रुती हिचा बुलढाणा येथील राजश्री शाहू कॉलेजमध्ये बी.ए.एम.एस. प्रवेश लागल्याने मेहकर येथील एसबीआय शाखेतून ५ लाख रुपये काढले. कारने बुलढाण्यात येऊन कॉलेजमध्ये पार्किंग करून आत गेले असता, मागावर असलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी कारचा काच फोडून रक्कम लंपास केली. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने एलसीबीचे पथक सक्रिय झाले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत पथक थेट शिवमोगा (कर्नाटक) येथे पोहोचले. सलग पाच दिवसांच्या शोधानंतर मुख्य आरोपी सुनिल ऊर्फ बाळू रामु बोवी (वय ३२, रा. भद्रावती, शिवमोगा) याला पेस कॉलेज परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने भाऊ विष्णु बोवी सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी सराईत असून विविध राज्यांत बॅगलिफ्टिंगचे गुन्हे दाखल आहेत.
ही धडाकेबाज कारवाई अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, पो.नि. सुनिल आंबुलकर पोलीस उपनिरीक्षक स्था गु शा. अविनाश जायभाये, पोलीस हेअर कॉन्स्टेबल दीपक लेकरूवाळे, चांद शेख, गणेश पाटील, गजानन गोरले, राजू आडवे, पवन मखमले, ऋषी खंडेराव एलसीबीच्या पथकाने पार पाडली.










