बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील चांडक ले-आउट येथील गजानन ऑटो गॅरेजमध्ये बॅटरीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका मजुरावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल 28 जानेवारी रोजी दुपारी घडली. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कलम 118(1) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी योगेश निंबाजी मोरे (वय 38, व्यवसाय मजुरी, रा. आनंदनगर, चिखली रोड, बुलढाणा) यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी आपली मोसा गाडी सर्व्हिसिंगसाठी गजानन ऑटो गॅरेजमध्ये घेऊन गेले असता, गॅरेज मालक गजानन सपकाळ यांनी बॅटरी खराब असल्याचे सांगून नवीन बॅटरी आणण्यास सांगितले. त्यानंतर मालकाने आपला मुलगा प्रदीप गजानन सपकाळ याला बॅटरी आणण्यास पाठवले.
थोड्याच वेळात वडीलांनी बॅटरी न आणल्याचा जाब विचारला असता, फिर्यादीनेही कामावर जायची घाई असल्याचे सांगितले. याच रागातून आरोपी प्रदीप सपकाळ याने कोणतेही कारण न देता हातातील स्क्रू-ड्रायव्हरने फिर्यादीच्या मानेला भोसकले. त्यामुळे फिर्यादीच्या मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
जखमी अवस्थेत फिर्यादीला तात्काळ सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल करून उपचार करण्यात आले. या घटनेचा तपास पोहेका रविंद्र हजारे करत असून पुढील तपास सुरू आहे.










