चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल)
मेहकर-चिखली मार्गावरील नागझरी फाटा येथे आज दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास भेगा पडलेल्या सिमेंट रस्त्यामुळे भीषण अपघात घडला. पेठ ता. चिखली येथील रहिवासी संजय गणपत तायडे (वय ३६ वर्षे) हे दुचाकीवरून पेठहून मेहकरकडे जात असताना रस्त्यावरील मोठ्या भेगेत दुचाकीचे टायर अडकले. क्षणात दुचाकीचा तोल गेला आणि संजय तायडे थेट सिमेंट रस्त्यावर आपटले.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तात्काळ चिखली येथील खाजगी जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार संजय तायडे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून सध्या काहीही ठोस सांगता येत नाही.विशेष म्हणजे हा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून भेगांनी भरलेला असून स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने डोळेझाक केली. अखेर या दुर्लक्षाचा फटका एका निष्पाप नागरिकाला बसला आहे.










