बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दि. 26 विकसित भारत 2047 च्या वाटचालीत बुलढाण्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकदिलाने ‘आत्मनिर्भर बुलढाणा’ घडवण्याचा संकल्प करावा, असा ठाम आणि आक्रमक संदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिला. देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस कवायत मैदानावर त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले.
भाषणात त्यांनी थेट आकडेवारी मांडत जिल्ह्याच्या प्रगतीचा पंचनामा केला. शेतीत उत्पादनवाढ, फळबाग लागवडीला चालना, रोजगारनिर्मिती, डिजिटल सेवा आणि निर्यातीतील झेप या सर्व आघाड्यांवर बुलढाणा पुढे असल्याचे त्यांनी ठसवले. खरीप-रब्बीतील मोठ्या प्रमाणावरील पेरणी, 22 हजार हेक्टरवरील फळबाग लागवड आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 429 कोटींचे थेट वितरण हे विकासाचे ठोस पुरावे असल्याचे ते म्हणाले.
जिगांव सिंचन प्रकल्पासाठी भूसंपादन व पुनर्वसन वेगात सुरू असून शेतकऱ्यांना 1600 कोटींची भरपाई देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी आयआयटी मुंबईमार्फत संशोधन सुरू असून पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. उद्योग क्षेत्रातही बुलढाण्याने बाजी मारली 874 कोटींच्या निर्यातीसह विभागात अव्वल, राज्यात चौथा क्रमांक; चालू वर्षी 1500 कोटींचे उद्दिष्ट
युवकांना थेट आव्हान देत जिल्हाधिकारी म्हणाले, नोकरी शोधणारे नाही, नोकरी देणारे बना. स्टार्टअप्स, अॅग्री-उद्योजकता, डिजिटल सेवा संधी भरपूर आहेत, कामगिरी दाखवा! ‘महसूल मित्र’ व्हॉट्सॲप चॅटबॉट, ‘पुनर्भू’ भूसंपादन प्रणालीसारख्या डिजिटल उपक्रमांनी प्रशासन अधिक पारदर्शक झाल्याचेही त्यांनी ठणकावले.पोलीस दलाच्या ‘मिशन परिवर्तन’मुळे गुन्हेगारीत घट झाल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. परेड, सामूहिक कवायती आणि जनजागृती कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिनाची शोभा वाढवली.










