जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) शहराच्या मध्यवर्ती भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व पंचायत समिती परिसरालगतचा मुख्य नाला गेल्या अनेक महिन्यांपासून कचऱ्याने पूर्णतः तुंबलेला असून, या घाणेरड्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट ओढावले आहे. नाल्यात साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा अक्षरशः कहर सुरू आहे. मात्र नगर परिषद प्रशासन कुंभकर्णाच्या निद्रेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते हिंमत चव्हाण यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद जळगाव जामोद यांना २२ जानेवारी २०२६ रोजी लेखी निवेदन देत तातडीने नाल्याची साफसफाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, गेल्या वर्षभरापासून या नाल्याची एकदाही योग्य स्वच्छता झालेली नाही. परिणामी पाण्याचा निचरा ठप्प झाला असून आजारांचे माहेरघर तयार झाले आहे.
नाल्याची तात्काळ स्वच्छता करावी, साचलेला कचरा उचलावा व भविष्यात अशी अवस्था होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण छेडण्याचा थेट इशाराही देण्यात आला आहे.आता तरी प्रशासन जागे होणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.










