बुलढाणा (हॅलो बुलडाणा) छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा यांच्या वतीने दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सर्वात भव्य व दिमाखदार शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती २०२६ च्या नियोजनासाठी बुलढाणा शहरातील शिवप्रेमींच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक शनिवार, २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता राजमाता चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर परिसरात संपन्न होणार आहे. या बैठकीत शिवजयंती उत्सव २०२६ साठी अध्यक्ष व सचिव यांची निवड करण्यात येणार असून, आगामी शिवजयंती कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन, मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, सजावट, सामाजिक उपक्रम तसेच सुरक्षिततेबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
शिवजयंती उत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्व शिवप्रेमींचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. तरी बुलढाणा शहरातील सर्व शिवभक्त, शिवप्रेमी नागरिकांनी या बैठकीस वेळेवर व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा (२०२५) यांच्या वतीने करण्यात आले आहे.












