मलकापूर (हॅलो बुलडाणा) रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. भरधाव वेग, निष्काळजी वाहनचालक आणि प्रशासनाची ढिसाळ वाहतूक व्यवस्था याचा आणखी एक बळी मलकापूरात गेला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मलकापूर शहराजवळ घडलेल्या भीषण अपघातात एका निष्पाप पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
कामावरून घरी परतल्यानंतर नेहमीप्रमाणे संध्याकाळचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले अनिल (वय 45) रस्ता ओलांडत असतानाच नागपूरहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की अनिल तब्बल १५ ते २० फूट हवेत उडून थेट रस्त्यावर कोसळले. डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि काही क्षणांतच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहनचालक पळ काढत असल्याने संतप्त नागरिकांनी महामार्गावर तीव्र संताप व्यक्त केला. दोन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
या महामार्गावर अपघात रोखण्यासाठी प्रशासन नेमकं काय करतंय, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. निष्पापांचे बळी कधी थांबणार? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.










