spot_img
spot_img

देवदूतच…! सावकारीच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका; जिल्हाधिकारी किरण पाटील यांचा धडाकेबाज पुढाकार

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात अवैध सावकारीच्या विळख्यात सापडून जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा हक्काची जमीन मिळवून देत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रशासनाची संवेदनशील पण कडक भूमिका स्पष्ट केली आहे. सावकारीच्या जाचातून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि आत्महत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी पाटील यांनी सुरू केलेली कारवाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, शेकडो शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश पडला आहे.

अवैध सावकारांकडून बळकावलेल्या जमीनी शेतकऱ्यांना परत मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत डॉ. किरण पाटील यांचा सत्कार केला. “जिल्हाधिकारी आमच्यासाठी देवदूत ठरले,” अशी भावना व्यक्त करत शेतकऱ्यांनी प्रशासनाचे मनापासून आभार मानले.

जिल्हाधिकारी यांच्या स्पष्ट निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार जलदगती सुनावण्या घेत अवैध सावकारांविरोधात थेट कारवाई सुरू आहे. चौकशीअंती बहुसंख्य प्रकरणांत शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत जमीनी परत करण्यात आल्या असून, दोषी सावकारांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

या मोहिमेत मेहकर, मोताळा, मलकापूर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आदी तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांना एकूण दहा-दहा एकरांपर्यंतची जमीन परत मिळाली आहे. सावकारीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांनाही न्याय मिळाल्याने प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील म्हणाले, “लोकहितासाठी बनवलेले कायदे प्रभावीपणे राबवणे हे माझे कर्तव्य आहे. बुलढाणा जिल्ह्यात अवैध सावकारांना थारा दिला जाणार नाही.” शेतकऱ्यांनी निर्भयपणे तक्रारी दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

याआधीच्या कारवाईत तब्बल 69 प्रकरणांतील 74.27 हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांना परत देण्यात आली असून 55 प्रकरणांत गुन्हे दाखल झाले आहेत. प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे सावकारांचे धाबे दणाणले असून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जिल्हा प्रशासन खऱ्या अर्थाने मैदानात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!