बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा शहरातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच १७ वर्षीय सेजल या तरुणीचा सकाळी मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी मध्यरात्री गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या या तरुणीचा अवघ्या काही तासांत मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे गंभीर आरोप करत रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला. संतप्त नातेवाईकांच्या आक्रोशामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सेजल ही तरुणी मेंदूच्या गंभीर आजाराने त्रस्त होती. बुधवारी रात्री सुमारे १२ वाजता तिला बुलढाण्यातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी ती दोन तासांपासून बेशुद्ध अवस्थेत होती, अशी माहिती तिच्या आईने डॉक्टरांना दिली. प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने तातडीने तिला उच्च उपचारासाठी इतरत्र हलवावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने इथेच उपचार सुरू करा, असा आग्रह नातेवाईकांनी धरल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
न्यूरॉन हॉस्पिटलचे डॉ. निलेश वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेजल हिच्यावर याआधी मेंदूतील कॅन्सरसाठी मुंबई येथे शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर औषधोपचार सुरू होते. मात्र बुधवारी रात्री दाखल करताना रुग्णाने कोणती औषधे, किती प्रमाणात घेतली, याची स्पष्ट माहिती नातेवाईक देऊ शकले नाहीत. त्यामुळे उपचारात अडचणी आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
गुरुवारी सकाळी रुग्णाची प्रकृती तशीच गंभीर होती. अचानक रक्तदाब वाढल्याने परिचारिकेला आवाज देण्यात आला. डॉक्टर रुग्णाकडे निघाले असतानाच सेजलचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर आरोपांची झोड उठवत मोठा आक्रोश केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.दरम्यान, उपचाराची पार्श्वभूमी लक्षात घेता काही नातेवाईकांनी मृतदेह घरी नेल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले.











