चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखली तालुक्यातील मेरा चौकी, मेरा खुर्द परिसरात काल रात्री सुमारे ८ वाजताच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव रमेश गणपत मोरे (वय ५५ वर्षे, रा. आंत्री खेडेकर, ता. चिखली) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश मोरे हे काल रात्री मेरा चौकी परिसरातून पायी जात असताना एका बेदरकार दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की रमेश मोरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेला दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ चिखली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पाठविण्यात आला आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा भरधाव वेग, वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि रात्रीच्या वेळी अपुरी सुरक्षितता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेचा पुढील तपास अंढेरा पोलीस करीत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.











