मुंबई (हॅलो बुलडाणा) राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अखेर आज अधिकृत बिगुल वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. या घोषणेसोबतच राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये आचारसंहिता तात्काळ लागू होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वाच्या निर्णयानंतर आयोगाला निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्यास न्यायालयाने परवानगी दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आयोगाला निवडणुकांसाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत या सर्व निवडणुका पार पडण्याची दाट शक्यता आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांमुळे ग्रामीण राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्ष तयारीला लागले असून, उमेदवारांची धावपळ वाढली आहे.











