बुलढाणा (हॅलो बुलडाणा) समाजाच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना आता माफी नाही! नशेची औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकणाऱ्या केमिस्ट व ड्रगिस्टांवर कठोर कारवाई केली जाईल, असा थेट व आक्रमक इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) गजानन घिरके यांनी दिला. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी भरकटत असताना औषध विक्रेत्यांची निष्काळजीपणा समाजासाठी घातक ठरत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
एनडीपीएस अॅक्टअंतर्गत नशेची औषधे, सायकोट्रॉपिक टॅब्लेट्स, सिरप्स यांची बेकायदेशीर विक्री अजिबात सहन केली जाणार नसून दोषींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. अन्न व औषध प्रशासनाच्या कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना त्यांनी ड्रग अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट, ड्रग अँड मॅजिक रेमेडीज अॅक्ट, मेडिकल डिव्हायसेस नियम 2017 यांचे उल्लंघन म्हणजे थेट कायद्याला आव्हान असल्याचे सांगितले.
डॉक्टरांनी ‘शेड्युल-के’चे पालन न केल्यास कारवाई अटळ असल्याचे घिरके यांनी बजावले. घाऊक विक्रेत्यांनी डॉक्टरांना थेट मोठ्या प्रमाणात औषध पुरवठा करणे थांबवावे, बिना बिल औषध खरेदी-विक्री किंवा साठवणूक हा गंभीर गुन्हा असल्याचे त्यांनी ठासून सांगितले











