बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उशिरा का होईना..पाऊस बरसला की थांबायचे नाव घेत नाही. तसा हा लहरी पाऊस जिल्ह्यात बरसल्याने जवळपास 90 ते 95 टक्क्यांपर्यंत पेरण्यापूर्ण झाल्यात. काही शेतकरी पेरण्या पूर्ण करून आषाढी वारीला गेले असून, ‘यंदा बळीचे राज्य येऊ दे’ असे विठ्ठलाला साकडे घातले.
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी कोळपणीच्या कामांत गुंतले आहेत. मात्र, पीकवाढीसाठी मोठ्या पावसाची अजूनही गरज आहे. जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. परंतु पावसाने खंड पाडल्याने मधातच पेरण्या लांबल्या होत्या. तरी जून अखेर 80 टक्के पेरण्या उरकल्या होत्या. गेल्या काही वर्षात पावसामुळे खरीप पेरणीचा टक्का वाढला.यंदा दमदार पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी नांदणार आहे. यावर्षी तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल जास्त वाढलेला दिसून येत आहे. दरम्यान भरघोस उत्पन्नाची आशा पल्लवीत झाली आहे. आषाढ वारीला अनेक शेतकऱ्यांनी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करीत ‘बळीराजाला सुख-समृद्धी’ मागितली आहे.