बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गोरगरीबांच्या ताटात थेट विष टाकण्याचा प्रकार उघडकीस येताच बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागाविरोधात युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मातृतीर्थ परिसरात अनेक दिवसांपासून शिधापत्रिकाधारकांना किडे लागलेले, उंदरांच्या लेंड्यांनी भरलेले, निकृष्ट व बोगस ज्वारी-तांदूळ वाटप होत असल्याचा गंभीर आरोप आहे. विशेष म्हणजे तक्रार करूनही प्रशासनाने डोळेझाक केल्याने संताप अनावर झाला.
युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर व विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ओम गायकवाड यांनी याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र कोणतीही दखल न घेता दुसऱ्यांदा पुन्हा तेच निकृष्ट धान्य वाटप करण्यात आले. हा प्रकार म्हणजे प्रशासनाचा बेशरमपणा असल्याचा आरोप करत दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी युवासेनेने थेट जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात अनोखे व संतापजनक आंदोलन छेडले.
आंदोलक कार्यालयात निकृष्ट तांदळाचा भात, ज्वारीची भाकर व ठेचा घेऊन दाखल झाले.
आम्हा गोरगरिबांना हेच खायला लावता, आम्ही तर खातोच; पण आता तुम्हीही खा, असा थेट सवाल करत त्यांनी प्रशासनाला आरसा दाखवला.
दरम्यान, जबाबदार अधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी आंदोलकांना सामोरे जाण्याऐवजी पळ काढल्याचा आरोप होत आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्या कार्यालयात आल्या व आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले.
यापुढे निकृष्ट धान्य येऊ दिले जाणार नाही, दोषी पुरवठादारावर कठोर कारवाई केली जाईल व लेखी उत्तर देण्यात येईल, असे आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले.
या घटनेमुळे जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गोरगरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची जोरदार मागणी होत आहे.












