बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात आदराने ओळखले जाणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव, तसेच ज्येष्ठ नेते स्व. विश्राम पवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने बुलढाणा शहरात शोककळा पसरली असून भाजप व संघ परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
स्व. विश्राम पवार हे अत्यंत निष्ठावान, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. संघकार्य असो वा पक्षकार्य, प्रत्येक जबाबदारी त्यांनी निस्वार्थ भावनेने आणि समर्पणाने पार पाडली. मित्रवत स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची हातोटी ही त्यांची खास ओळख होती. अनेक तरुण कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरले.
त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाने एक अनुभवी मार्गदर्शक गमावला आहे. स्व. पवार यांचे विचार, कार्यशैली आणि संघभावना पुढील पिढीसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. या दुःखाच्या प्रसंगी पवार कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, हीच सर्वांची प्रार्थना.












