बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यासाठी नववर्षाची सुरुवात एका अत्यंत आनंददायी आणि ऐतिहासिक घटनेने झाली आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात बिबटे, अस्वल, तडस यांसारख्या हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या सोबतीला आता थेट वाघाची दिमाखदार एन्ट्री झाली आहे.मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास ‘पीकेसीटी-1’ नावाचा पुरुष जातीचा वाघ देव्हारी तसेच बोरखेड–तारापूर जंगलालगत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आला.
विशेष म्हणजे हा वाघ सोडण्यात आलेल्या बंदिस्त जाळी असलेल्या क्षेत्रात अगदी तीन तासांतच रूळला. सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास त्याने पहिली शिकार करून आपली ताकद आणि जंगलाशी जुळवून घेण्याची क्षमता सिद्ध केली. वन्यजीव विभागाने वाघासाठी आधीच शिकारीचा बंदोबस्त म्हणून एक हेला सोडला होता. मोठ्या क्षेत्रात शिकार कुठे आहे याची माहिती नसतानाही पीकेसीटी-1 ने शिताफीने शोध घेत हेल्याचा फडशा पाडला. त्यामुळे वन अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हा वाघ पेंच व्याघ्र प्रकल्पातून ज्ञानगंगामध्ये आणण्यात आला असून त्याचे मूळ पांढरकवडा व्याघ्र प्रकल्प आहे. सध्या त्याचे वय 35 महिने असून तो किशोरावस्थेत आहे. फेब्रुवारी–मार्च 2023 मध्ये त्याच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर चार ते पाच महिन्यांचे असताना तो आणि त्याची बहीण पेंच येथे हलवण्यात आले होते. आता तीन वर्षांचा झाल्यानंतर पीकेसीटी-1 ला ज्ञानगंगामध्ये आणण्यात आले असून वाघीण अजूनही पेंचमध्येच आहे.
जवळपास 15 ते 16 तासांच्या प्रवासानंतर वाघ जिल्ह्यात दाखल झाला. त्याला सुरुवातीला बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या हलवण्यात आले होते. तीन ते चार तासांनंतर तो शुद्धीत आला आणि त्यानंतर बंदिस्त क्षेत्रात सोडण्यात आला.प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी यांच्या विशेष प्रयत्नातून ज्ञानगंगा अभयारण्यात दुसऱ्यांदा वाघ दाखल झाला आहे. पीकेसीटी-1 ने लगेचच शिकार केल्यामुळे हा वाघ इथल्या जंगलात नक्कीच रूळेल, असा विश्वास वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.











