मेहकर (हॅलो बुलडाणा) आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पाऊल टाकत ४० जणांची स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली असून, या यादीत मेहकरचे कर्तृत्ववान मेहकरचे दमदार आमदार सिद्धार्थ खरात यांचा समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे मेहकरच्या राजकारणावर शिवसेनेची ठसठशीत मोहोर असून, स्थानिक नेतृत्वाला मिळालेली मोठी मान्यता आहे.
नुकत्याच पार पडलेल्या मेहकर नगरपालिका निवडणुकीत आमदार सिद्धार्थ खरात यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली शिवसेनेने विरोधकांचा सुपडा साफ केला. अचूक रणनीती, प्रभावी नियोजन आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलेली ऊर्जा यामुळे शिवसेनेचा भगवा थेट मेहकर नगरपालिकेवर फडकला. शहरप्रमुख किशोर भास्करराव गारोळे यांची नगराध्यक्षपदी निवड होऊन शिवसेनेने सत्ता काबीज करत आपली ताकद दाखवून दिली.
या दणदणीत यशाची दखल घेत पक्ष नेतृत्वाने आमदार खरात यांच्यावर थेट राज्यस्तरीय प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. ही निवड म्हणजे त्यांच्या नेतृत्वगुणांवर आणि विजयाची खात्री देणाऱ्या कार्यशैलीवर शिक्कामोर्तब आहे.स्टार प्रचारक यादीतील समावेशाची बातमी मिळताच मेहकरमध्ये शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. या निर्णयामुळे मेहकरचा राजकीय दबदबा वाढला असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आक्रमक विजयाकडे वाटचाल करेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.











