spot_img
spot_img

शेतकऱ्याच्या गोठ्यात बिबट्यांचे कुटुंब!बिबट्यांचा बंदोबस्त केव्हा? दुधा-कळंबेश्वरमध्ये भीतीचं साम्राज्य

हिवरा आश्रम (हॅलो बुलडाणा/ पवन गाडेकर) परिसरातील दुधा–कळंबेश्वर शिवारात बुधवारी सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. थेट शेतातील गोठ्यात दोन बिबटे आणि त्यांच्यासोबत पिल्ले आढळल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. दुधा-कळंबेश्वर रस्त्यालगत सुभाष खुरद यांच्या शेतातील गोठ्यात सकाळी सुमारे ८ वाजता दोन बिबटे निघताना दिसले. विशेष म्हणजे, त्यापैकी एका बिबट्याच्या तोंडात पिल्लू असल्याचे दृश्य शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिले. ही दृश्ये अंगावर काटा आणणारी होती.

बिबटे पसार झाल्यानंतर शेतकऱ्यांनी गोठ्याची तपासणी केली असता, आतच आणखी एक बिबट्याचे पिल्लू आढळून आले. त्यामुळे शिवारात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. शेतात काम करणारे मजूर, महिलांसह नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाची संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सहायक वनसंरक्षक वैभव काकडे व घाटबोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. दरम्यान, बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत असून, तोपर्यंत रात्रीचा विद्युत पुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी सरपंच विद्या सुभाष खुरद यांनी केली आहे

कासारखेड शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

कासारखेड येथे विश्वास सवडतकर यांची गाय बिबट्याने ठार मारल्याची घटना घडली असून, त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असून, रात्रीची भीती अधिक वाढली आहे. कासारखेड शिवारात गहू व हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात फेर असल्याने बिबट्याचा वावर वाढल्याची शक्यता व्यक्त होत आहे.वनविभागाने तातडीने दखल घेऊन संबंधित बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!