बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा अर्बन बँकेबाबत पसरवण्यात येत असलेल्या खोट्या, दिशाभूल करणाऱ्या अफवांना संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी जोरदार शब्दांत फेटाळून लावले आहे. बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत,स्थिर व अभेद्य असून ठेवीदारांचा एक रुपयाही धोक्यात नाही, असा ठाम विश्वास त्यांनी दिला आहे. मल्टिस्टेट स्तरावर आजघडीला बँकेकडे सुमारे ४ हजार कोटी रुपयांची कॅश लिक्विडिटी उपलब्ध असून ३ हजार कोटींची मालमत्ता संस्थेच्या नावावर आहे.
मराठवाड्यातील काही शाखांबाबत जाणूनबुजून अफवा पसरवून ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना घाबरवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप चांडक यांनी केला. बुलढाणा अर्बन तुमचं तारण सोनं विकणार, ७० हजार तोळ्याने घेतलेलं सोनं गमावाल अशा थापांवर विश्वास ठेवून काही ठिकाणी गर्दी झाली. मात्र प्रत्यक्षात बँकेने एकही ग्राहकाचं सोनं विकलेलं नाही, ना विकणार आहे, हे त्यांनी ठणकावून सांगितले.
मराठवाड्यातील प्रत्येक शाखेवरील ठेवींपेक्षा बँकेची गुंतवणूक दुप्पट असल्याचे स्पष्ट करत, सुमारे ४०० कोटी रुपये सुरक्षित गुंतवलेले असल्याची माहिती त्यांनी दिली. कर्जवाटप, वसुली व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू असून कर्ज १००% सुरक्षित, ठेवी १००% सुरक्षित असल्याचा ठाम दावा करण्यात आला.
ग्राहक कधीही येऊन आपलं तारण ठेवलेलं सोनं सोडवू शकतो. संस्थेची ताकद एवढी मोठी आहे की अशा अफवांनी ती ढळणार नाही, असा स्पष्ट इशारा देत चांडक यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले. अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या,अफवांवर विश्वास ठेवून स्वतःचं व संस्थेचं नुकसान करू नका, असे आवाहन त्यांनी ठामपणे केले आहे.
आशिया खंडातील अग्रेसर बुलडाणा अर्बन प्रत्येक शाखातील बॅंकिंग कामकाज सुरळीत असून कुठल्याच खोट्या अफवांना बळी पडू नका : बुलडाणा अर्बन अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर











