बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नवीन वर्षाच्या जल्लोषात कुणाचाही जीव धोक्यात जाणार नाही, यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासन पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जिल्हाभरात विशेष मोहीम राबवली जाणार असून नियम तोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे.
नववर्षाच्या रात्री शहरांसह ग्रामीण भागातील प्रमुख रस्ते, महामार्ग, चौक, हॉटेल परिसर, फार्महाऊस, रिसॉर्ट्स व पार्टी स्थळांवर पोलिसांची कडक नाकाबंदी असणार आहे. प्रत्येक वाहन चालकाची तपासणी करण्यात येणार असून ब्रेथ अॅनालायझरद्वारे मद्यधुंद चालकांना तात्काळ हेरले जाईल.
मद्यपान करून वाहन चालवणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळ तर आहेच, पण निष्पाप नागरिकांच्या जीवावरही बेतणारे गंभीर गुन्हेगारी कृत्य आहे. त्यामुळे दोषी आढळणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड, परवाना निलंबन, गुन्हा दाखल करणे तसेच वाहन जप्तीपर्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे एसपी तांबे यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी नववर्षाचा आनंद घ्यावा; मात्र जबाबदारीचे भान राखावे. मद्यपान केल्यास वाहन चालवू नये, टॅक्सी, मित्र किंवा पर्यायी वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.











