spot_img
spot_img

मेहकर येथे रक्तरंजित थरार! चारित्र्याच्या संशयातून पतीचा हैवानपणा; पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या

मेहकर (हॅलो बुलडाणा) जिल्ह्याला हादरवून टाकणारी, माणुसकीला काळीमा फासणारी दुहेरी हत्या मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी, प्रभाग क्रमांक १ येथे रविवारी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने थेट हैवानपणाचा कळस गाठत झोपेत असलेल्या पत्नी व चार वर्षाच्या निष्पाप चिमुकल्यावर कुऱ्हाडीने वार करून दोघांची निर्घृण हत्या केली. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण मेहकर शहर हादरून गेले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) व तिचा चार वर्षांचा मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी पती राहुल हरी म्हस्के (वय ३५) याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन ही कृत्ये केल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यात चिमुकला रियांश जागीच ठार झाला, तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रूपाली यांना शेजाऱ्यांनी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे नेत असताना जालना परिसरात त्यांचा मृत्यू झाला.

राहुल म्हस्के, त्याची पत्नी, मुलगा, वडील, आई व आजी असे सहा जण एकत्र वास्तव्यास होते. घरातील सर्वजण झोपेत असताना राहुलने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलून पत्नी व मुलाच्या डोक्यावर सपासप वार केले. संशय, मानसिक अस्थैर्य आणि संतापाचा हा स्फोट अख्ख्या कुटुंबासाठी काळ ठरला.

घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. आरोपी राहुल म्हस्के याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!