मोताळा (हॅलो बुलडाणा) किरकोळ संशयातून शेजाऱ्याने थेट कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना मोताळा तालुक्यातील कोल्ही बोलर गावात घडली.२६ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास देविदास मुरलीधर सपकाळ (वय २७) याच्यावर डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर जखमी करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, देविदास सपकाळ हा आपला भाऊ विशाल व काका दामोदर सपकाळ यांच्यासह घरासमोर शेकोटीजवळ बसून गप्पा मारत होता. याचवेळी शेजारी राहणारा अजय राजू सोलंके (वय २५) हा हातात कुऱ्हाड घेऊन अचानक तेथे आला. तुम्ही आमच्याबद्दल बोलून हसता असा आरोप करत त्याने शिवीगाळ सुरू केली. देविदासने शांततेने समजावण्याचा प्रयत्न करताच अजय सोलंकेने संतापाच्या भरात तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत दोन्ही हातांनी कुऱ्हाड उचलून थेट डोक्यावर जबर वार केला.
या प्राणघातक हल्ल्यात देविदास खाली कोसळला. कपाळातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली. घटनेनंतर आरोपीने कुऱ्हाड घटनास्थळी टाकून पलायन केले. जखमी देविदासला तात्काळ मलकापूर येथील खासगी रुग्णालयात, त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक नागेश रामदास जयले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.










