बुलडाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील जयस्तंभ चौक परिसरात भाजीपाला बाजारात झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरी, हरवणूक अशा घटनांची भीती असतानाच, काल एक दिलासादायक आणि समाजाला दिशा देणारी घटना घडली आहे. जयस्तंभ चौक येथे वाहतूक सुरळीत ठेवण्याचे कर्तव्य बजावत असताना एका महिलेची पर्स हरविल्याची बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आली. सदर पर्समध्ये रोख १,२०० रुपये तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे होती.
वाहतूक पोलीस कर्मचारी पोहेका सुनील किनगे व पोहेका श्रीकृष्ण कुवारे यांनी तत्काळ दक्षता घेत पर्स ताब्यात घेतली. केवळ पर्स सापडली म्हणून विषय संपवला नाही, तर पर्समधील कागदपत्रांच्या आधारे संबंधित महिलेची खात्रीशीर ओळख पटवून, संपूर्ण व्हेरिफिकेशन केल्यानंतर पर्समधील पैसे व साहित्य जैसेच्या तसे त्या महिलेला परत करण्यात आले.
आज जिथे प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला आहे, तिथे बुलडाण्याच्या वाहतूक पोलिसांनी केलेली ही कृती केवळ कर्तव्यदक्षतेची नव्हे, तर समाजासाठी आदर्श ठरणारी आहे. जयस्तंभ चौकात नेहमीच वाहतूक कोंडी, गर्दी असते; अशा ठिकाणीही पोलिसांचा हा सतर्क आणि प्रामाणिक चेहरा नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणारा ठरतो आहे.











