spot_img
spot_img

जगन्नाथ पुरी धामात बुलडाण्याचा गौरव! भाईजींना ‘अमृत प्रसाद’ सन्मान

बुलडाणा (हॅलो बुलडाणा)  जगन्नाथ पुरी येथील श्रीमद्भागवत महापुराण कथामंडपात ‘बुलडाणा अर्बन’चे संस्थापक राधेश्याम देवकिशन चांडक उपाख्य भाईजी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. २७ डिसेंबर २०२५ रोजी स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘अमृत प्रसाद’ मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, कंठमणी हार व पगडी देऊन भाईजींचा गौरव करण्यात आला.

यावेळी आशीर्वचन देताना स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज म्हणाले की, शालेय जीवनात अर्थशास्त्र व इंग्रजी विषयांत अपयश आले असले तरी, सहकार आणि अर्थकारणाच्या माध्यमातून भाईजींनी आज १८ लाख सभासदांचे जीवन उजळवले आहे. इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या अनेक शिक्षण संस्था उभारून त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी भरीव योगदान दिले. गेल्या २० वर्षांपासून रागावर मिळवलेले नियंत्रण आणि सेवाभावी वृत्ती नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या साध्या व्यक्तिमत्त्वात असामान्य नेतृत्व दडलेले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

या प्रसंगी ‘समर्पण’ या भाईजींच्या जीवनावरील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले तसेच ‘अमृत प्रसाद’ ध्वनीचित्रफित प्रदर्शित झाली. बुलडाणा अर्बन परिवार व चांडक परिवाराच्या वतीने वेदकार्याकरिता ४८ वेद विद्यालय, धर्मश्री प्रतिष्ठान व वेदश्री तपोवन या संस्थांना एकूण २५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.

सत्काराला उत्तर देताना राधेश्याम चांडक म्हणाले की, स्वतःपुरते न जगता समाजासाठी दिलेले योगदानच जीवनाला अर्थ देते. बुलडाणा अर्बन ही २६ हजार कोटींची संस्था विश्वासावर उभी असून वेळेचे नियोजन, दिलेला शब्द पाळणे व क्रोधावर नियंत्रण ही यशाची तीन सूत्रे असल्याचे त्यांनी सांगितले. रागामुळे नाती उद्ध्वस्त होतात, म्हणून सुखी जीवनासाठी क्रोधाचा त्याग आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले.

या सोहळ्यास नंदकिशोर झंवर, डॉ.विनोद मंत्री, नंदकिशोर बाहेती यांच्यासह अनेक मान्यवर व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!