संग्रामपुर (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील पातुर्डा गावात एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील शेतकरी व पशुपालक शेख मुकतार शेख महेताब हे शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन करतात. नेहमीप्रमाणे शेतातून शेळ्यांची चराई करून घरी परतल्यानंतर एका बकरीचा अस्वस्थ ओरडण्याचा आवाज येऊ लागला. परिस्थिती ओळखून शेख मुकतार यांनी तत्काळ बकरीच्या गोठ्याकडे धाव घेतली.
बकरीला प्रसूती होणार असल्याची जाणीव होताच शेख मुकतार यांच्यासह लक्ष्मण वानखडे यांनी अथक प्रयत्न सुरू केले. अखेर बकरीने एक अत्यंत विचित्र पिलाला जन्म दिला. या पिलाला तब्बल ८ पाय आणि एकच तोंड असल्याचे दिसून आले. जन्मानंतर काही वेळातच, सुमारे अर्ध्या तासात, या पिलाचा मृत्यू झाला.
ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच नागरिकांनी शेख मुकतार यांच्या गोठ्याकडे गर्दी केली. अनेकांनी हे दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त केले. अशा प्रकारची घटना क्वचितच पाहायला मिळते, त्यामुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे.











