बुलढाणा (हॅलो बुलडाणा) समाज परिवर्तनाच्या दिशेने सकारात्मक पावले टाकणारा संवेदना प्रतिष्ठान ग्रुप आज राज्यभरात एक आदर्श सामाजिक चळवळ म्हणून ओळखला जात आहे. समाजातील विविध घटकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा ग्रुप केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता, व्याख्यानमाला, वधू -वर परिचय मेळावे, तसेच गीत गायनाच्या माध्यमातून जनजागृती असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवत आहे.
ग्रामीण भागातील तरुणाईला योग्य दिशा मिळावी, कुटुंबव्यवस्था मजबूत व्हावी, व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढावी, या उद्देशाने प्रतिष्ठान विविध ठिकाणी व्याख्यानमालांचे आयोजन करत आहे. या व्याख्यानांमधून सामाजिक मूल्ये, नीतिमत्ता, महिलांचे सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व आणि कुटुंबसंस्कार यावर प्रभावी मार्गदर्शन केले जाते.
त्याचप्रमाणे वधू-वर परिचय मेळाव्यांमुळे अनेक कुटुंबांना योग्य स्थळ शोधण्यास मदत होत असून, हुंडामुक्त, साध्या व सुसंस्कृत विवाह संकल्पनेला चालना मिळत आहे. यामुळे समाजात वाढत चाललेली खर्चिक आणि दिखाऊ विवाह पद्धतीला एक सकारात्मक पर्याय निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे गीत गायन व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवण्याची संवेदना प्रतिष्ठानची पद्धत अत्यंत प्रभावी ठरत आहे. व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, स्त्री सन्मान, राष्ट्रीय एकात्मता यासारखे विषय गीतांच्या माध्यमातून लोकांच्या मनापर्यंत पोहोचवले जात आहेत.
या सातत्यपूर्ण आणि निःस्वार्थ कार्यामुळे संवेदना प्रतिष्ठान ग्रुपचा राज्यातील सर्वोत्तम सामाजिक ग्रुप म्हणून उल्लेख होत आहे. अनेक सामाजिक संस्था, नागरिक आणि तरुण वर्ग या चळवळीशी जोडला जात असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
खऱ्या अर्थाने समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा हा ग्रुप आज अनेकांसाठी आदर्श ठरत असून, “संवेदनातूनच समाज घडतो” हेच संवेदना प्रतिष्ठान आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवत आहे.











